सातपाटील
‘आमचे हे भरतखंड ही जगातल्या साऱ्या मानवी वंशांच्या घुसळणीची पुण्यभूमी आहे.’
सातशे वर्षांचा ‘कुलवृत्तान्त’ लेखक रंगनाथ पठारे यांनी आपल्या या कादंबरीत विस्तृतपणे मांडला आहे.अल्लाउद्दिन खिलजी याच्या १२८९ च्या स्वारी पासून ते आजच्या एकविसाव्या शतकातील दुसर्या दशकापर्यंतचा, दीर्घ कालखंड रंजकपणे विश्लेषण केलेला आहे.
सातपाटील, यात हिंदू-मुस्लीम-मराठा/पेशवे-इंग्रज तसेच स्वातंत्र्य नंतरच्या त्या- त्या काळातील राजकीय-सामाजिक-धार्मिक आणि गावगाड्याचे विस्तृत वर्णन असले तरी, मुख्य कथानक हे श्रीपती पठारे या मुळ पुरुषांपासून सुरू होते, तर त्यानंतर साहेबराव पठारे याचे सातपाटील होण्यापासून पुढे दसरत, जानराव, रखमाजी- पिराजी, शंभुराव ते आजचे देवनाथ सातपाटील यांच्या कर्तबगारीची, शौर्याची, पराक्रमाची, हिंमत आणि धैर्याची कथा विस्तारत जाते.तेवढेच महत्त्व निवेदक, त्यांच्या आयुष्यात आलेल्या कर्तबगार नायिकांनाही देतो. एव्हाना या घडामोडींना त्या-त्या काळातील महिलाच कारणीभूत होत्या असे तो मानतो….
या कादंबरीत सातपाटलांचे धागेदोरे थेट सीमापार- अफगाणिस्तान ते इंग्लंड पर्यंत पसरलेले आहेत.घडणार्या घटनाक्रमात अनेक योगायोगांची साखळी आहे.त्यामुळे कथानक खूपच रोमहर्षक आणि अंगावर ही येते.उदा.पाणिपतच्या लढाईत दसरत हा अब्दालीच्या सैन्याच्या विरोधात लढताना, त्याला भास होतो की, तो स्वतःवरच घाव घालून स्वतःचाच जीव घेतो आहे, स्वतः सोबतच लढतो आहे… नंतरचे कथानक उच्च कोटींचे शिखर गाठते; वाचताना आपल्याला भान राहत नाही, त्या सोबतच आपण वाहत जातो.अशाप्रकारे कथानकातील प्रत्येक सातपाटलांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी उच्च शिखर गाठतात…
युद्धभूमीवर अठरा पगड जाती कोणत्याही भेदाशिवाय फक्त सैनिक म्हणून लढतो; परंतु युध्दा नंतर गावगाड्याने घालून दिलेली जातीय व्यवस्था विनातक्रार पाळली जाते, त्याला इलाज नसतो…?
जसे-जसे कथानक पुढे- पुढे जाते तसे- तसे शिव- शाहू फुले आंबेडकर यांचा ओझरता उल्लेख येत राहतात.
जातींचा अभिमान बाळगणाऱ्यांचा जातीवादातील पोकळपणा दाखवून, त्याला जबरदस्त हादरा देण्याचं काम ही कादंबरी यशस्वीपणे करते.
७९६ पानांची ‘सातपाटी’ ही कादंबरी अत्यंत सोप्या भाषेत/लोकभाषेत असून लेखकाने लईभारी मांडणी केली आहे…
